मुंबई : राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टनिमित्त विविध कार्यक्रमांचं आय़ोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे दहीहंडीवरची बंदी उठवल्यानंतर मुंबईत दहीहंडीचा उत्साह दिसून येतोय.एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा तयार झालेत.

ठाण्यात 9 थर लावणाऱ्या गोविदांसाठी 11 लाख तर घाटकोपरमध्ये 25 लाखांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. हे पारितोषिक मिळवण्यासोबतच गोविंदांच्या सुरक्षेसाठीही आयोजकांकडून जोरदार तयारी करण्यात येतेय.

हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय करण्यात आलीय.

दहीहंडी खेळावरील सर्व निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने हटवले आहेत. त्यामुळे दहीहंडीचे सर्व नियम ठरवण्याचा अधिकार सरकार आहे. त्यामुळे यंदा मुंबईसह राज्यभरात नऊ किंवा त्यापेक्षा जास्त थराच्या दहीहंड्या दिसू शकतात.

मात्र थरांच्या उंचीसंदर्भात निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. हायकोर्टाच्या या निकालाने गोविंदा पथक आणि आयोजकांना मोठा दिलासा मिळाल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.

तर 14 वर्षांखालील मुलं दहीहंडीत सहभागी होणार नाहीत, याची काळजी घेऊ, असं आश्वासन राज्य सरकारने हायकोर्टात दिलं. त्यामुळे यंदा दहीहंडीची उंची कितीही असली तर सर्वात वरच्या थरावर बालगोविंदा दिसणार नाही.

दहीहंडीच्या थरांची उंची, गोविंदाची सुरक्षितता, त्यांची वयोमर्यादा या सर्व विषयांना हात घालणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध लावले होते. मात्र आज पूर्वीचे निर्बंध बाजूला ठेवून सुनावणी केली जाईल हे उच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं.

दरम्यान, दहीहंडी, गणेशोत्सव सणांना साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांनी घेतला आहे. न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि त्याचं उल्लंघन झाल्यास, होणारी कारवाई, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

साऊंड सिस्टममालकांच्या या निर्णयाला दहीहंडी समन्वय समितीनंही पाठिंबा दिला आहे. तसंच दहीहंडी समन्वय सिमितीने दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा इशारा दिला आहे.

डॉल्बीच्या दणदणाटामुळे दरवर्षीच साऊंड सिस्टीम आणि आवाजाच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाय डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालकांना कारवाईला सामोरं जावं लागतं.

या सर्व प्रकारामुळे साऊंड सिस्टीम मालकांनी यंदा दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम न देण्याचा इशारा दिला आहे.