मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कचं रुपडं आता पालटणार असून शिवाजी पार्क आता कायमस्वरुपी आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीचा सर्वप्रथम विनियोग शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाईसाठी होणार आहे. 


दादरच्या शिवाजी पार्कचं 24 एकर क्षेत्रफळाचं हे मैदान महाराष्ट्राच्या राजकीय , सामाजिक, सांस्कृतीक इतिहासाचं अभिन्न अंग आहे. मैदानात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा,  बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ, मीनाताई ठाकरे चौक आणि समोर असलेलं  संयुक्त महाराष्ट्र कलादालन यांनी शिवाजी पार्कशी जोडल्या गेलेल्या असंख्य आठवणी याच मैदानात कोरल्या गेल्या आहेत. या मैदानावरच ठाकरे कुटुंबातल्या पहिल्या  ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेच मुख्यमंत्री आता आपल्या आमदार निधीतला पहिला खर्च हा शिवाजी पार्कवर करत आहेत.


कसं बदलणार शिवाजी पार्कचं रुपडं? 
शिवाजी पार्कचे फूटपाथ कायमस्वरूपी कंदील आणि दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघणार आहेत. शिवरायांच्या स्मारक परिसरातील दीपमाळ आणि ऐतिहासिक भित्तीचित्रालाही (म्युरल्स) झळाळी मिळणार आहे. तसंच शिवाजी महापाजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती कायमस्वरुपी स्पॉटलाईटच्या दिव्यांचे प्रकाशझोत सोडले जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी  इलेक्टि्रक मशालींनी कायमस्वरुपी रोषणाई केली जाणार आहे.


बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, मिनाताई ठाकरे चौक यांचेही सुशोभिकरण होईल. सीएसएमटीच्या धर्तीवर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन स्मारकावरही कायमस्वरुपी रोषणाई केली जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेकडे सव्वाकोटींचा आमदार निधी वर्ग करण्यात आलाय.


संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि शिवाजी पार्कवरील  एकूण सर्व कामांसाठी पालिकेनं अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरुन निवीदा मागवल्या आहेत. 


शिवाजी पार्कवर दिवाळीत मनसे दरवर्षी विद्युत रोषणाई करत असते. पण आता सेनेकडून शिवाजी पार्कवर कायम स्वरूपी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यामुळे याला मनसे-शिवसेना असा राजकीय रंगही आला आहे.


महत्वाच्या बातम्या :