सेना भवन आणि राजगडापासून अगदी हाकेच्या अंतरावर अर्धवट बांधकाम इमारत. अर्धवट बांधकामाप्रमाणं इथल्या रहिवाशांचंही स्वप्न अर्धवट राहिलं आहे. बिल्डरवर विश्वास ठेवून 2006 साली रहिवाशांनी जुन्या घरावर हातोडा मारण्याची परवानगी दिली. पण बिल्डरनं फसवलं आणि रहिवाशांच्या हातचं तेलही गेलं आणि तूपही.
माधुरी साळुंखे, वय 53 वर्षे. बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळं कर्जबाजारी झाल्या. हातची नोकरी सुटली. रहिवाशांनी तात्पुरता आडोसा तयार करुन संसार थाटले आहेत. पण पाण्याविना आणि अंधारात. डोक्यावर मेघगर्जना सुरु असताना राहायचं कसं असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे?
याच ठिकाणी राहणारी सुप्रिया पांचाळ बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकते. पण तिला अभ्यास करणं कठीण झालं आहे.
शिवसेनेनं आता फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात जन आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. मात्र हे निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर तर नाही ना असा प्रश्न उभा राहतो आहे?
दादरमधल्या 500 मराठी कुटुंबांची हीच अवस्था आहे. त्यामुळं अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांना आता या प्रश्नावर तोगडा काढावाच लागेल. अन्यथा घोडं मैदान दूर नाही. हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावं.