Dadar Kabutar khana News: काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा सपाटा लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, जैन समाजाने (Jain Community) या कारवाईला कडाडून विरोध केला होता. याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. मुंबईच्या दादर परिसरात जैन समाजाने रस्ता रोखून धरत मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर (Dadar Kabutar Khana) लावलेली ताडपत्री चाकू आणि सुऱ्यांनी फाडून काढली होती. मात्र, यानंतरही मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या भूमिकेवर ठाम राहिली होती. परंतु, जैन समाजाच्या काही मुनींना विनाकारण आक्रमक भाषा वापरत राज्य सरकार आणि न्यायव्यवस्थेला ललकारले होते. मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दादरचा कबुतरखाना बंदही झाला होता आणि या सगळ्यावरुन रंगलेले राजकारणही आपोआप थंडावले होते. मात्र, आता जैन समाजाच्या एका नव्या कृतीमुळे हा कबुतरखान्यांचा हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
जैन समाजाकडून येत्या 11 ऑक्टोबरला दादरमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दादरच्या योगी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या जैन धर्मसभेत मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. ही बातमी ऐकून अनेकांना हसावे की रडावे, हे कळेनासे झाले आहे. मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरु व्हावेत ही जैन समुदायाची इच्छा आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी आता जैन समाजाने पुन्हा प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे. दादरमधील ही प्रार्थना सभा याच प्रयत्नांचा एक भाग असू शकते. यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कबुतरखान्यांचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. यावरुन जैन विरुद्ध मराठी असा वाद निर्माण होऊन अमराठी मतांचे ध्रुवीकरण होऊ शकते. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
Mangalprabhat Lodha: मंगलप्रभात लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यासाठी पडद्यामागून हालचाली?
मुंबईतील कबुतरखाने बंद होऊ नयेत, यासाठी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. मुंबईत कबुतरखान्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. जैन समाजाचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या बैठकीच्यावेळीही मंगलप्रभात लोढा आघाडीवर होते. त्यांनी यासंदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांनी कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन मंगलप्रभात लोढा यांना स्पष्टपणे फटकारले होते. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असे राज ठाकरे यांनी सुनावले होते.
आणखी वाचा
दादर कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजाचं महत्त्वाचं पाऊल, कबुतरांना खाणं घालण्यासाठी शोधली नवी जागा