मुंबई : दाभोळकर-पानसरे प्रकरणांचा तपास आणखी किती वर्ष करणार आहात? कर्नाटकातील याच्याशी निगडीत प्रकरणात खटले सुरूही झाले, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील खटल्यात आरोपींवर आरोपही निश्चित करण्यात आलेत. मग महाराष्ट्रात याप्रकरणात आठ वर्षांत इतकी संथ प्रगती का? अश्या पद्धतीनं जर कारभार होत असेल तर जनतेच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची? असे सवाल शुक्रवारी हायकोर्टानं तपासयंत्रणांना विचारले. गेल्यावर्षी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी निवृत्त झाल्यानंतर वर्षभरानं हे प्रकरण आता पुन्हा सुनावणीसाठी आलं आहे.
पुण्यात साल 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानतंर साल 2015 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंना कोल्हापुरात मारण्यात आलं. मात्र, तपासयंत्रणा अजूनही अपयशीच असल्याचा, याचिकाकर्त्या कुटुंबियांचा आरोप आजही कायम आहे. मात्र, या दोन घटनानंतर शेजारील राज्यात डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात तपास पूर्ण होऊन खटल्याला सरूवातही झाली. तिकडच्या तपासयंत्रणांनी इथं येऊन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तिथं त्यांच्या चौकशीत इकडच्या या दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यामुळे नक्की राज्यातील तपासयंत्रणा काय करत आहेत? यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही तपासयंत्रणांना गंभीर होण्याचा इशारा देत जलदगतीनं तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची पहिलीच सुनावणी पार पडल्यानं 30 मार्चच्या पुढील सुनावणीत सीबीआय आणि एसआयटीला तपासातील प्रगीतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
तपासात होणाऱ्या या विलंबामुळे न्यायदानाच्या कामातही विलंब होतोय याचं भान ठेवा. केवळ ताब्यात आलेल्या आरोपींवर लक्ष देऊ नका, जे फरार आरोपी मोकाट आहेत त्यांचं काय? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं दाभोळकर-पानसरे हत्याकांड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयनं कोर्टाला कळवलं की दाभोळकर हत्याकांड प्रकरणी वापरलेलं हत्यार अद्याप खाडी पात्रातून सापडलेलं नाही. तर कॉम्रेड पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीनं कळवलयं की ताब्यात असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.