मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र सरकारने राज्यभरात लोक डाऊन केले आहे. तसेच संचारबंदी सुद्धा करून कलम 144 लावून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार असून त्यासाठी आता लोक बाहेर पडताना दिसत आहेत. भाजीपाला घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याच चित्र मुंबईच्या दादर येथे पाहायला मिळालं. मात्र मुंबई पोलीस या ठिकाणी सज्ज झाल्याच चित्रही पाहायला मिळत आहे.

मुंबई पोलिसांनी लोकांना वारंवार त्यांच्या वायरलेसद्वारे आवाहन केले की, तुम्ही गर्दी करू नका आणि योग्य पद्धतीने, जितकं शक्य होईल कमी गर्दी करत आपल्या घरांतून बाहेर पडा आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन पुन्हा घरी जा.' एवढचं नाहीतर शक्य होइल तेवढं अंतर ठेवा, विनाकारण गर्दी करू नका असं आवाहनही पोलीस करताना दिसून आले. तसेच पोलिसांनी स्वतः गर्दीच्या ठिकाणी जात गर्दीचं नियोजन केलं.

गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त गर्दी आपल्याला टाळता येईल. अशातच राज्य शासनाकडून निर्देश देऊनही लोकांची गर्दी पाहायला मिळाली. राज्य सरकारच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, 'जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नका. कारण ही दुकानं बंद करण्यात येणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं सुरूच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढचं घ्या.'

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह

दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.