मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या घटनेसंबधी पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप म्हणाल्या की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती". त्यावर रेल्वेने उत्तर दिले आहे की, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे". मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर याबाबत म्हणाले की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती."


दोन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

यावर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तरिदेखील आमचे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि अधिकारी घटनास्थळी असून जखमींची मदत करत आहेत.

नगरसेविका सानप म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झाले नव्हते, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे,

परंतु रेल्वेने याप्रकरणी म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी या पुलाचे ऑडीट करुन आम्ही या पुलाची डागडुजी केली होती

या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. परंतु प्रशासन मात्र मुंबईकरांना टोलवाटोलवीची उत्तरं देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ पाहा



मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार
ज्या प्रशासनाकडे या पुलाची जबाबदारी होती. त्यांच्यावर मुंबई पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. पुलाचा काही भाग आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या अखत्यारित आहे. तर अर्धा भाग एम.आर.ए मार्ग पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


VIDEO