मुंबई : नवी मुंबईतल्या नेरुळ येथील छत्रपती शिवाजी नगर येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. काही महिन्यापूर्वीच्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी आरोपींनी राजेश इंगळे आणि वैभव सदवर या दोघांना शिवाजीनगरमध्ये बोलावले होते. दोघेही तिथे पोहोचताच तिथे लपून बसलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळीने दोघांवर जीवघेणा हल्ला केला.

दोघांवरही चाकून वार करण्यात आले, तसेच रॉडने जबर मारहाणही केली. या हल्ल्यानंतर दोघांनाही स्थानिकांनी जवळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. परंतु राजेश इंगळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वैभव सदवर गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

आरोपी अमित शेख, अविनाश जाधव, ओंकार राठोड या तिघांचा हत्येत सहभाग आहे. आरोपींना अटक करत नाही तोवर राजेशचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा राजेशच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींवर याआधी नवी मुंबईतील वेगवेग्ळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हयांच्या नोंदी असल्याची माहिती मिळाली आहे.