ठाणे : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. याबाबत विधिमंडळातही आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलीस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, न्याय मिळेल, असे किसन कथोरे म्हणाले.

याबाबत आपण विधिमंडळातला पाठपुरावा सुरू ठेवणार असून मुख्यमंत्री 'वन मॅन शो' आहेत, त्यामुळे आपली मागणी पूर्ण करून घेणारच, असा विश्वास कथोरेंनी व्यक्त केला. शिवाय शिवसेना आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ही मागणी मान्य करावीच लागेल, असा चिमटाही कथोरे यांनी काढला. आता आमदार कथोरे यांची ही मागणी कधी पूर्ण होते, हे पाहावे लागेल.

2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे.