मुंबई : शिवडी येथील शौचालयामध्ये कुजलेल मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, 14 दिवस हा मृतदेह शौचालयामध्ये  होता. मात्र रुग्णालयाला याची कुणकुणसुद्धा लागली नसल्याने रुग्णालयाचा बेजाबाबजदरपणा चव्हाट्यावर आला आहे.


शिवडी येथील रुग्णालयामध्ये एका 27 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. या मृती व्यक्तीचं नाव सूर्यभान तेज बहादुर यादव असून तो आरे कॉलनी येथे राहणारा होता. 30 सप्टेंबर रोजी सूर्यभान यादव कोविड पॉझिटिव्ह आला ज्याच्या नंतर त्याला  शिवडी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल. 4 ऑक्टोबरला टीबी रुग्णालय प्रशासनाने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये  सूर्यभान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण सूर्यभानचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयातच  कुजलेल्या अवस्थेत 14 दिवसापासून पडून असल्याचं समजलं. रुग्णालयाला याबाबत कोणतीच माहिती नसल्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


टीबी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने एक कुजलेला मृतदेह सापडल्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रचंड दुर्गंधी आणि सहज ओळख पटविणे मुश्किल अशी  मृतदेहाची अवस्था झाली होती. रुग्णालय प्रशासनाच्या नोंदी आणि इतर सर्व तपासल्यानंतर या व्यक्तीची ओळख पटली. मृत व्यक्ती याच रुग्णालयात उपचार घेत होता असे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.


मृतदेह शौचालयात कुजेपर्यंत कुणीच कसा पाहिला नाही तसेच मृत्यूबाबतच्या इतर सर्व मुद्यांवर रुग्णालयाच्या वतीने विभागीय चौकशी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांचाही तपास सुरु असल्याचे रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील सोहोनी यांनी सांगितले. तपासात येणाऱ्या तथ्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.


मृतदेह 14 दिवस रुग्णालयाच्या शौचालयामध्ये  होता आणि रुग्णालयाला या बद्दल काहीच माहित नाही. ही घटना अतिशय धक्कादायक असून थेट रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


सूर्यभान यादव यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. सूर्यभानच्या मृत्यूने यांचावर दुःखांचा डोंगर तर कोसळकाच पण त्या बरोबरच घरचा कमावणारा आधारही हरपला.