विरार : किकी डान्स चॅलेंजच्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना कोर्टाने शिक्षा सुनावल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. विरार रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणाऱ्या तिघा युवकांना स्वच्छता आणि सुरक्षेविषयी जनजागृती करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

तिघा युवकांना वसई रेल्वे स्थानकात जाऊन तीन दिवस प्रवाशांमध्ये रेल्वेविषयी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत जनजागृती करायची आहे. नाटक सादर करुन प्रवाशांना सुरक्षा आणि स्वच्छतेची माहिती देण्यास कोर्टाने सांगितलं आहे.

9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या तीन दिवसात सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत तिघांना हे जनजागृती अभियान करायचं आहे. विशेष म्हणजे हे नाट्य 13 ऑगस्टला कोर्टात सादरही करायचं आहे.

20 वर्षीय निशांत राजेंद्र शहा, ध्रुव अनिल शहा आणि 24 वर्षीय श्याम राजकुमार शर्मा असं किकी डान्सवर स्टंट करणाऱ्या तिघांची नावं असून हे तिघंही विरार पश्चिमकडे राहणारे आहेत.

सध्या हे तीन युवक वसई रेल्वे स्थानकात आपल्या दोघां मित्रांसोबत हातात बॅनर घेऊन प्रवाशांना आपण केलेलं कृत्य कुणीही करु नका, असं आवाहन करताना दिसत आहेत.

स्वच्छता आणि सुरक्षेविषयी माहिती देताना नाटकाची तालीमही करत आहेत. हे सर्व महाविद्यालयीन तरुण असून आपण कोणत्याही मालिकेत काम करत नसल्याचं या युवकांनी सांगितलं.

काय आहे किकी चॅलेंज?

'किकी, डू यू लव्ह मी? आर यू रायडिंग?' असे ड्रेक- इन माय फीलिंग या 'किकी' गाण्याचे शब्द आहेत. चालत्या गाडीतून उडी मारायची आणि चालत असलेल्या गाडीच्याच वेगाने गाण्यावर नाचत चालायचं, असं या चॅलेंजचं स्वरुप आहे. सोशल मीडियावर सध्या 'किकी चॅलेंज' चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे.

हा धोकादायक चॅलेंज फॉलो करताना तु्म्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकताच पण इतरांच्या जीवाशीही खेळता. त्यामुळेच जाणकारांनी या चॅलेंजच्या नादी न लागण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे. आतापर्यंत जगभरातील अनेक तरुण किकी चॅलेंज करताना अपघातग्रस्त झाले आहेत.