मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नशेसाठी आणलेला कफ सीरपचा तीस लाखांचा साठा हस्तगत केला आहे. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.
गुजरातहून मोठ्या प्रमाणावर 'कोडेन फॉस्फेट' या सीरपचा साठा मुंबईत येणार असून तो नशेसाठी वितरित केला जाणार असल्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी त्यांच्या मागावर होते. एक टेम्पो भरून कफ सीरपच्या बाटल्या मुंबईत आणण्यात येताच पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथून एक टेम्पो ताब्यात घेतला.
या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते तर अन्य दोघे या कफ सिरपची नशेसाठी खरेदी करण्यासाठी आले होते. टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5760 कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला.
मरिन लाईन्स बडा कब्रस्थान येथून वानखेडे स्टेडियम काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी या सीरपची डील केल्यास कोणाला संशय येणार नाही, या उद्देशाने या जागेची निवड करण्यात आली असावी, असं शिवदीप लांडे यांनी सांगितलं. अटक केलेल्या आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नशेसाठी आणलेले टेम्पोभरुन कफ सीरप जप्त, तीस लाखांचा साठा हस्तगत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Mar 2019 11:34 PM (IST)
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -