कल्याण : मुलाच्या लग्नाचा खर्च नागरिकांच्या लसीकरणाकरणासाठी खर्च करण्याचा निर्णय कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे 4 मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुलाचे लग्न अत्यंत साधेपणा करण्याचा निर्णय गणपत गायकवाड यांनी घेतला आहे. 


मुलाच्या लग्नासाठी जो खर्च येणार होता, ते सगळे पैसे विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेसाठी खर्च केले जातील, अशी घोषणा आमदार गायकवाड यांनी केली आहे. मतदारसंघातील 1500 नागरिकांना स्वखर्चातून लस उपलब्ध करून देण्याचा निर्धार गायकवाड यांनी केला. तसेच मी अद्याप लस घेतली नसून आधी कल्याण पूर्वेत जनतेला लस देणार, मगच मी लस घेणार असंही, गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्वेतील महानगरपालिकेची कोरोना  रुग्णालये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे कल्याण पूर्व भागात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी मी माझ्या आमदार निधी मधून 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी ठाणे राजेश नार्वेकर यांना पत्राद्वारे केल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.


राज्यात तिसऱ्या टप्प्यातही मोफत लस मिळणार?


राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.  मागील मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे यावर चर्चा झाली होती. चांगली आणि स्वस्त 15 कोटी लसी विकत घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार सकारात्मक आहेत. यासाठी ग्लोबल टेंडर काढून 15 कोटी लस विकत घेणार आणि मोफत लसीकरण राज्य सरकार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.