बदलापूर : राज्यभरात वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम जोरात राबवण्यात येत असला, तरी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात मात्र वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप होतो आहे.

बदलापूर नगरपालिकेने मागील वर्षी संविधान बंगला, एरंजाड, मोहपाडा, कान्होर रोड या भागात वृक्षारोपण केलं होतं. त्यात जवळपास 10 हजार झाडं लावण्यात आली होती. मात्र झाडं लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे पालिकेनं लक्षच न दिल्यामुळे यातली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडं जगली. पण धक्कादायक बाब म्हणजे यंदा पुन्हा याच जागेवर झाडं लावण्यासाठी पालिकेने लाखो रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. फरक इतकाच आहे, की मागील वर्षी सर्व्हे नंबरनं जागेला ओळख देण्यात आली होती, तर यंदाच्या वर्षी वॉर्ड नंबर टाकून या जागेला ओळख देण्यात आली आहे.

वृक्षरोपणाच्या कामात ठेकेदार आणि अधिकारी वर्गाचा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी केला आहे.

या सगळ्याबाबत बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारलं असता वन विभागाने आम्हाला लहान झाडं दिल्यामुळे त्यांची नीट वाढ झाली नाही, असं हास्यास्पद उत्तर दिलं आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राज्य सरकारनं वृक्षलागवड करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली, त्याला राज्यभरात चांगलं यशही मिळालं. पण बदलापूरसारखे प्रकार पाहिल्यानंतर अधिकारी वर्गाला या उपक्रमाचं गांभीर्यच कळलेलं नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे.