Night Vaccination Center Mumbai : कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये सोमवारपासून संध्याकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. रात्रीची लसीकरण केंद्रे ही रेल्वे स्थानक परिसरात असणार आहे. त्यामुळे कष्टकरी, सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत.
मुंबईसह राज्यात लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत रात्रीच्या वेळीचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा फायदा मुंबईमधील नोकरदार, कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कामावरून घरी परताना लस घेणे त्यांना शक्य होणार आहे. अनेकजण नोकरी, रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी घरी परतात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय, अनेकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी त्यांना वेळेअभावी, आवश्यकेतेनुसार लस घेण्याची वेळ मिळाली नाही. अशांना या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.
याआधी लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे अनेकांना लस घेता येत नव्हती. आता रात्री 11 पर्यंत लसीकरण होणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये प्रशासनाकडून रात्रीचा दिवस! दुर्गम भागात रात्रीच्या लसीकरणावर भर
- Corona in Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या!, कोरोना वाढीचा दर वाढतोय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha