मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे प्रशासन या कोरोनाबाधितांचा शोध घेत असताना आता या रुग्णांना बरे झाल्यानंतरही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बरे होऊन हे रुग्ण घरी परतल्यानंतर त्यांना विभागातील नागरिक विभागात घेत नसल्याचे समोर येत आहे. घाटकोपर पूर्व येथील शास्त्रीनगर विभागात राहणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला असून कोरोना निगेटिव्ह आला आहे.


मात्र उपचार करून घरी परतल्यानंतर त्याला विभागातील नागरिकांनी विभागात राहण्यास विरोध केल्याने त्याला त्याच्या कुटुंबासह विभागाबाहेरील एका खाजगी शाळेत क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. मात्र यामुळे या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असून आपण आता कुठे जायचे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.


राज्यात आणि मुख्यत: मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली आहे. अशा स्थितीत प्रशासनावर ही मोठा ताण आहे. त्यात नागरिकांनी जर अशा बऱ्या झालेल्या रुग्णांना आधार दिला नाही तर राज्यात आणि मुंबईत आणखी मोठा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे लोकांनी स्वतःची काळजी तर घ्यावीच त्याचबरोबर या अशा रुग्णांनाही हिम्मत देऊन त्यांचा स्वीकार करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नगरसेविका आणि मुंबई मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी व्यक्त केले आहे. आता नागरिकांनी स्वतःची काळजी तर घ्यावीच त्याच बरोबर माणुसकी म्हणून तरी अशा कोरोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांना दिलासा देणे गरजेचे आहे.


मुंबईत आकडा 857 वर 

मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा आकडा मुंबईत झपाट्याने वाढत चालला आहे. आज नव्याने मुंबईत 143 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई महापालितका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 857 वर पोहोचला आहे.


मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. रॅपिड टेस्टसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर आता मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला मुंबईत सुरुवात होईल, अशी माहिती आहे. रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळते. तसं इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.