मुंबई : ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी रक्तदान करावं. कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करु नये, असं काहीही नाही. रक्तदान केल्याने कुठलाही धोका नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते.


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत. आता त्यातच रक्ताची कमतरता भासू लागली आहे.


रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा!
याविषयी राजेश टोपे म्हणाले की, "ब्लड बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजपासून 10-15 दिवस पुरेल एवढंच रक्त या बँकेत शिल्लक आहे. सगळ्यांना आवाहन आहे आणि ब्लड बँकेनेही दखल घ्यावी की, मोठ्या संख्येने ब्लड कलेक्शनचं काम करावं परंतु त्यामुळे संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना असताना रक्तदान करु नये असं काही नाही. याची संपूर्ण माहिती घेऊन सांगत आहोत. त्यामुळे रक्तदान केल्याने संसर्ग होणार नाही किंवा वीकनेस येणार नाही. रक्ताचा कमी झालेला साठा पुन्हा भरुन काढावा.


सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरु ठेवावं : राजेश टोपे
रक्तदान सुरु राहिलं पाहिजे. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम शिथिल करता येणार नाही. फार गर्दी करु नये. परंतु रक्तदान हे सामाजिक भान असलेलं कार्य आहे आणि गरजेची बाब आहे. सध्याची ही मागणी आहे. मोठे कॅम्प न घेता, जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दहा-दहाच्या ग्रुपमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरु ठेवावं, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी




  • मुंबई - 38

  • पुणे मनपा - 16

  • पिंपरी चिंचवड मनपा - 12

  • नागपूर- 4

  • यवतमाळ - 4

  • नवी मुंबई - 4

  • कल्याण - 4

  • अहमदनगर - 2

  • पनवेल - 1

  • ठाणे - 1

  • उल्हासनगर - 1

  • औरंगाबाद - 1

  • रत्नागिरी - 1


Rajesh Tope | ब्लड डोनेशनचे मोठे कॅम्प घेणे टाळावे पण 50 ते 100 लोकांचे कॅम्प चालतील : राजेश टोपे