मुंबई : मागील दोन महिन्यांत कोरोना व्हायरसची बाधा झाल्यामुळे आत्तापर्यंत 5 बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून कुठलीही मदत अद्याप मिळालेली नाही. राज्यात आणि देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृत्यूची संख्या देखील वाढत चालली आहे. अशी परिस्थिती असताना देखील शासनाकडून सध्याच्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना मात्र कसलंही विमा संरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांना आरोग्य संरक्षणासाठी 50 लाखांचा विमा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेस्ट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूर यांनी मागणी केली आहे.


याबाबत बोलताना देविदास तुळजापूर म्हणाले की, सध्या लॉकडाऊनच्या काळातही बँक कर्मचारी बँकिंग सेवा नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. मुंबईत काम करणारे असंख्य बँक कर्मचारी मुंबई उपनगरात राहतात. त्यांना अशा परिस्थितीत दररोज कामावर यावं लागत आहे. सध्या लोकल, रेल्वेसेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवासासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य महामंडळाच्या बसमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे उपनगरातील अनेक कर्मचाऱ्यांना घरीच बसण्याशिवाय पर्याय नाही.


सरकार बँक कर्मचाऱ्यांकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या सेवा घेत आहे. परंतू त्यांना तो दर्जा देतं नाही. त्यामुळेच 50 लाखांच्या विमा संरक्षणाचं कवच त्यांना उपलब्ध नाही. आत्तापर्यंत मुंबईमध्ये पाच बँक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 स्टेस्ट बँक ऑफ इंडिया, 1 आयडीबीआय बँक, 1 पंजाब नॅशनल बँक आणि 1 फेडरल बँकेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.


त्यामुळे आगामी गंभीर होतं चाललेली परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीने प्रवास करण्याची परवानगी सरकारने उपलब्ध करून द्यावी. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना कामावर जाणे आणखी अवघड होणार आहे. जर कर्मचारी कामावर गेलेच नाहीत तर बँका चालणार कशा, असा सवाल निर्माण होतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बँक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे.


Social Distancingसाठी मंचरमध्ये छत्री पॅटर्न, महिलांचं घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन