मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोळी समाजाच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे झालेल्या त्यांच्या मृत्यूने वरळी विभागात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.


कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तीन दिवसांपूर्वीच वरळी कोळीवाड्यात कर्फ्यू लावून परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात महापालिकेकडून निर्जंतुकीकरण सुरु आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह स्वत: कोळीवाड्यात येऊन नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं होतं. इथल्या 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.




वरळी पोलीस कॅम्पामध्येही कोरोनाचा शिरकाव
वरळी कोळीवाडा, आदर्श नगरनंतर आता वरळी पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारत सील केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. तर पत्नी कस्तुरबा रुग्णालयात असून मुलाला सेव्हन हिल्स तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलं आहे


आदित्य ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
वरळी हा युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळीतील परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे. मोबाईल फोन आणि सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून ते माहिती घेत आहेत. तसंच पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन रहिवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.


Coronavirus | Worli Koliwada परिसर पोलिसांकडून सील; कोरोनाचा संशयित आढळल्याने खबरदारी