मुंबई : गेले दोन दिवस सोशल मीडियावर 'ओ ' रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना कोरोना आजराचा धोका नाही, त्यामुळे त्यांनी लस नाही घेतली तर चालेल, अशी माहिती पसरत आहे. मात्र, वैद्यकीय तज्ञांच्या मते रक्तगट कुठलाही असू द्या लस सर्वांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.


लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून अनेक प्रकारचे लसीकरणाला घेऊन संदेश व्हायरल होत आहेत. काही माहिती ही अर्धवट सत्य तर काही चुकीची असल्याचे त्याची सत्यता पडताळून पाहिले की लक्षात येते. व्हाट्सअप फॉरवर्डच्या काळात कोणतीही माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरत जाते. काही लोकं असे संदेश आले की ते त्याची सत्यता न पडताळता फॉरवर्ड करणे यामध्ये कर्तव्य मानत असतात. अशा या संदेशामुळे लोकांमध्ये बऱ्याच प्रकारचे गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे राष्ट्रीय लसीकरणाच्या या जिकिरीच्या कामामध्ये मोठे अडथळे निर्माण करू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा पद्धतीचे संदेश फॉरवर्ड करताना विचार करून ते पुढे पाठवावेत. येत्या काळात या आणि अशा प्रकारचे अनेक अर्धवट माहिती असणारे संदेश येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


COVID-Vaccination | पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार!


याप्रकरणी, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, महासंचालक, डॉ. शेखर मांडे सांगतात की, "ही माहिती अर्धवट आहे. याबाबत खरी माहीती अशी आहे की, 'ओ निगेटिव्ह' रक्तगटातील काही नमुन्यात कोरोना विरोधात लढणारी प्रतिपिंडे आढळून आली आहेत. मात्र, त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी लस घेऊन नये. रक्तगट कुठलाही असू द्या सगळ्यांनी लस घेणे अपेक्षित आहे.


तर याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केइएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "ओ नेगेटिव्ह रक्तगटात काही नमुन्यात जरी असे काही प्रतिपिंडे आढळली असली तरी त्याचा लसीकरणाशी काही संबंध नाही. संशोधन स्तरावरील ह्या गोष्टी असतात यासंदर्भात शास्त्रीय पातळीवर काम सुरु असते. त्यामुळे कुणीही याचा सोयीनुसार अर्थ काढू नये."


लसीकरणाच्या अनुषंगाने कोणत्या व्यक्तींनी लस घेऊ नये या संदर्भात आरोग्य विभाग, संबंधित लस निर्मिती करणारी कंपनी वेळोवेळी प्रसार माध्यमे यांच्या मार्फत माहिती देत असतात आणि देत राहणार आहेत. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.


Covid 19 vaccination | पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात लस घेणार