मुंबई : मानखुर्द येथील गतीमंद मुलांचे वसतिगृह असलेल्या 'चिल्ड्रन्स होम' सोसायटीमधील 30 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. मोठ्या संख्येने गतीमंत मुलांना कोरोनाची लागण होणं ही चिंतेची बाब आहे. या चिल्ड्रेन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव नेमका कसा झाला? याचा शोध घेण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.


मानखुर्दमधलं गतीमंद मुलांना नवी उभारी देणारं त्यांचं हक्काचं घर म्हणजे चिल्ड्रेन्स होम. या ठिकाणी एकूण 268 मुले राहतात. दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होममध्ये अचानक काही मुलांना खोकला सुरु झाला. चिल्ड्रन्स होम व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून ही माहिती दिली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये फिवर कॅम्पचं आयोजन केलं. या फिवर कॅम्पमध्ये मुलांची स्क्रीनिंग करण्यात आली आणि त्यानंतर आलेला अहवाल धक्कादायक होता.

महापालिकेनं काय केलं?


चिल्ड्रन होममधील मुलांची एकूण संख्या 268 आहे. स्क्रीनिंगनंतर 84 मुलांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यात 25 मुलं आणि 5 मुलींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यापैकी दोन मुलांना इतर आजार असल्याने त्यांना सायन रुग्णालयात उपचाराकरता हलवले आहे. तर इतर 27 मुले बीकेसी कोविड सेंटर येथे दाखल केली आहेत.


मुंबई महापालिकेकडून या चिल्ड्रन होमचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच, आजुबाजूच्या परिसरातील रहिवासी आणि इतर वसतीगृहांतही स्क्रीनिंग केली जात असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. सोबतच, संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे.


कशी झाली चिल्ड्रेन होममधील मुलांना कोरोनाची लागण?


चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, मुलांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा झाला का? हे प्रश्न आता समोर येतात. याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. चिल्ड्रन्स होम मधील मुलांच्या आरोग्याकडे कोरोना संकटकाळात विशेष लक्ष असणे आवश्यक असते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने या मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोकाही मोठा असतो. म्हणूनच, चिल्ड्रन होममध्ये झालेला कोरोनाचा प्रवेश चिंता वाढवणारा आहे.