मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका तुलनेने कमी असेल, असा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्च या संस्थेने आपल्या सर्वेक्षणात केला आहे. सर्वेक्षणानुसार साधारणपणे 80 टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ह्या अभ्यासात दुसऱ्यांदा करोना होणाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना होण्याचा धोका असल्याचंही या सर्वेक्षणात नमूद केले आहे. 
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्च या संस्थेने केलेले सर्वेक्षण तिसऱ्या लाटेबाबत मुंबईकरांची चिंता काहीशी कमी करणारे आहे. या सर्वेक्षणानुसार 80 टक्के मुंबईकराना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे किंवा ते कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग मुंबईत वाढणार नाही, अस या सर्वेक्षणमध्ये सांगण्यात आलाय


मात्र, जरी तिसऱ्या लाटेत सर्वेक्षणानुसार कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका नसला तरी व्यक्तींना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याच सुद्धा सांगितलं आहे. देशात करोनाचा शिरकाव होऊन 17 महिन्यांहूनही अधिक काळ आता लोटला आहे. त्यामुळे ज्यांना अगदी सुरुवातीला पहिल्या लाटेतच कोरोना होऊन गेला, त्यांच्यातली अँटिबॉडीज आता कमी झाली असतील तर त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं मत या संशोधकांनी मांडल आहे


टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डमेंटल रिसर्चचे सर्वेक्षणमधील मुद्दे 



  • डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता साधरणपणे सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना आपल्याला करावा लागेल. 

  • 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात आल्याने या लाटेचा धोका तुलनेने कमी असेल. 

  • शिवाय जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकऱण झालं आणि लस 75 ते 95 टक्के प्रभावी ठरली तर मात्र या तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होईल.

  • सोबतच तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याबाबत खबरदारी घेणे सुद्धा आवश्यक आहे.


मुंबईत स्थानिक प्रशासनाने पुनर्बाधितांवर लक्ष केंद्रित करायला हवं आणि लवकरात लवकर त्यांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे अजूनही ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, अशा 20 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरज असल्याच संशोधकांचं म्हणणं आहे.


त्यामुळे या सर्वेक्षणानुसार काही प्रमाणात मुंबईकरांची तिसऱ्या लाटेची चिंता कमी होत असली तरी नागरिकांनी घालून दिलेले नियम पाळण्याची आणि प्रशासनाने अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरण करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे. जेणेकरून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्ष येणारी तिसरी लाट तुनलनेने कमी धोक्याची राहील.