मुंबई : मुंबई मेट्रोच्या असल्फा स्थानकाला लागून असलेल्या खैराणी रोडवर थिनरच्या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. केमिकलचे गाळे, लाकडाचे कारखाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने ही आग काही वेळातच भडकली आणि पसरत गेली. या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत आजूबाजूची सुमारे 30 ते 35 गोदामे जळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरु होते. काल रात्री 11.30 च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.





साकीनाका येथील खैरानी रोडवर अनेक व्यावसायिक गाळे आणि गोदामे आहेत. दाटीवाटीचा परिसर, केमिकल आणि लाकडांची गोदामे आणि त्याला लागूनच अनेक झोपड्यांमुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. रसायने आणि लाकूड यांसारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीच्या प्रचंड ज्वाळा उठल्या होत्या. 3 ते 4 किमीपर्यंत या आगीचे लोळ पाहायला मिळत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालं.


दहा फायर इंजिन, आठ जम्बो टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले. मात्र दाटीवाटीचा भाग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. सद्यस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन आगीबाबात चौकशी केली.


आग लागल्यानंतर प्रथम त्याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काढण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळं मोठे ड्रम हवेत उडून स्फोट होताना दिसले. त्याचबरोबर थिनर गटारात वाहून आल्यानं गटारातूनही आगीच्या ज्वाळा भडकताना दिसत होत्या.




Fire | असल्फा मेट्रो स्टेशनलगतच्या परिसरात अग्नितांडव | ABP Majha