मुंबई : काँग्रेसच्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावरुन गोंधळ निर्माण झाला होता. संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांनी निरुपम यांना विरोध केला.

संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानं हा गोंधळ झाला. काही नेते पक्षात आले पण तरी पक्षाची संस्कृती अंगवळणी अजून नाही पडली अशी टीका काही काँग्रेस नेत्यांनी निरुपम यांच्यावर केली.

संजय निरुपम उत्तर मुंबईमधून निवडणूक लढत होते. मात्र भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीमुळे संजय निरुपम यांना त्यांचा मतदार संघ बदलायचा आहे.

आजच्या मतदारसंघ आढावा बैठकीत संजय निरुपम यांनी गुरुदास कामत यांच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. याच मतदार संघातून कृपाशंकर सिंह हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

तर दुसरीकडे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण? यावरुन नसीम खान आणि प्रिया दत्त यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रिया दत्त यांच्या समर्थकांची पुन्हा प्रिया अशा घोषणा देत त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. तर नसीम खान समर्थकांची नसीम खान यांच्या नावासाठी आग्रह केला.

अशारीतीने दोन मतदारसंघात उमेदवारीच्या नावावरून मोठा गोंधळ झाला. अखेरीस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करत सर्वांच्या कार्यकर्त्यांना शांत केलं. त्यामुळे उमेदवारी वाटपावरुन मुंबई काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची चांगली दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच बंडाळी माजण्याची मोठी शक्यता आहे.