ठाणे : कीड लागलेल्या बिस्किटांचा पुडा विकणाऱ्या पार्ले कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. ग्राहकाला 35 हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने पार्ले कंपनी आणि किरकोळ विक्रेत्याला दिले आहे.
गेल्या आठवड्यात मोहम्मद झुबेर शेख यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमधून तक्रारदाराने 25 रुपयांचा पार्ले-जी बिस्किटांचा पुडा घेतला होता. पुड्यातील बिस्किटांना कीड लागल्याचा दावा शेख यांनी केला. ग्राहक मंचाचे अध्यक्ष ए. झेड. तेलगोटे यांनी बिस्किटाच्या पॅकेटची तपासणी केली.
पुड्यावर जानेवारी 2015 ही पॅकेजिंग डेट असून एक्स्पायरी डेट दिसत नसल्याचं त्यांना आढळलं. ही सेवेतील कुचराई असून त्यामुळे तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास झाल्याचं मंचाने स्पष्ट केलं.
वैद्यकीय तपासणीत बिस्किटाच्या पुड्यात लार्व्हा आणि कॉबवेब असल्याचं समोर आलं. त्यामुळे ही बिस्किटं खाण्यास धोकादायक असल्याचं सांगत ग्राहक मंचाने हा निकाल दिला.
पार्ले कंपनी किंवा रिटेलरतर्फे कोणीही न्यायालयात हजेरी लावली नाही. त्यांच्या अनुपस्थितीत हा निकाल देण्यात आला. मानसिक त्रासासाठी 25 हजार, तर फीचे 10 हजार अशी 35 हजार रुपयांची नुकसानभरपाई तक्रारदाराला देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले.
प्रॉडक्ट्स नीट न ठेवल्यामुळे ही समस्या उद्भवली असेल, असं पार्लेचे कॅटेगरी हेड मयांक शाह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
बिस्किटांच्या पुड्यात कीडे, पार्ले कंपनीला ग्राहक कोर्टाचा दणका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 08:33 AM (IST)
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमधून तक्रारदाराने 25 रुपयांचा पार्ले-जी बिस्किटांचा पुडा घेतला होता. पुड्यातील बिस्किटांना कीड लागल्याचा दावा शेख यांनी केला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -