मुंबई: पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी वरळीत दिग्गजांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळीत शिंदेंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी गेले. त्यावेळी पोलीस कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला आणि पोलिसांना न्याय द्या अशी घोषणाबाजी केली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी विलास शिंदे यांना शहीद घोषित केलं.

 



 

पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीही शिंदे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 23 ऑगस्टला विलास शिंदे कर्तव्य बजावत असताना त्यांना दोन मुलांनी बेदम मारहाण केली. गेल्या आठ दिवसांपासून ते लिलावती रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 

दरम्यान, विलास शिंदे यांचे पार्थिव सातारा येथे रवाना करण्यात आलं आहे.

 

- विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

 

- सर्वपक्षीयांची उद्या वरळी बंदची हाक  

 

- मुंबई ट्राफिक पोलीस कर्मचारी व अधिकारी त्यांचा एक दिवसाचा पगार विलास शिंदेच्या कुटुंबीयांना देणार

 

काय आहे प्रकरण?

 

गेल्या मंगळवारी वांद्रे इथं कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन विना हेल्मेट गाडी चालवताना पकडलं. त्याच्याकडे लाईसन्सदेखील नव्हतं. याबाबत चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलानं आपल्या भावाला बोलावून घेतलं. त्याच्या मोठ्या भावाने मागून येऊन थेट पोलिसाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

 

दरम्यान विलास शिंदे यांना सहकारी पोलिसाने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 

संबंधित बातम्या:

 

मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन