मुंबई : पेंग्विंन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर तो कार्यक्रम उधळून लावू असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी दिला. यासंदर्भात नितेश राणेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी पेंग्विन प्रकल्पातील कंत्राटदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
पेंग्विनं दर्शन हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, जोपर्यंत पेंग्विन प्रकल्प प्रकरणाची लोकायुक्तांकडून चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नसल्याचं नितेश यांनी सांगितलं.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नसेल, तर पेंग्विनदर्शन कार्यक्रम होऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली. शिवाय, "हायवे कंस्ट्रक्शन नावाच्या कंपनीला पेंग्विन आणण्याचा अधिकार नसताना, त्यांनी आणले होते. त्याबाबत लोकायुक्तांकडेही चौकशी सुरु आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पेंग्विन प्रकल्पाचं उद्घाटन करता येणार नाही", असेही नितशे राणे म्हणाले.
"ज्या हायवे कंस्ट्रक्शनला पेंग्विनच्या देखभालीचे काम दिले गेले आहेत, त्याच कंपनीचे मालक असलेल्या तन्मय राय हे पेंग्विन पक्षांसाठी बांधलेल्या कमी दर्जाच्या पिंजऱ्यामुळे काळ्या यादीतील कंत्रादार आहेत.", असे नितेश राणे म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांवर थेट 'मातोश्री'चा वरदहस्त आहे, असा घणाघाती आरोपही नितेश राणेंनी केला.