मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आज मुंबईत पार पडली. राज्यातील 48 पैकी 40 जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र उरलेल्या 8 जागांसंदर्भातील चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.


उर्वरित आठ जागांबद्दलची चर्चा अजूनही सुरु आहे. मात्र याबद्दल कोणतीही अडचण नाही. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या पातळीवर याबद्दल चर्चा होईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. अहमदनगर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रावेर, नंदुरबार, पुणे, मुंबई उत्तर मध्य आणि परभणी या आठ जागांचा तिढा अद्याप कायम आहे.


बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटलांची दांडी


काँग्रेस-राष्ट्रवादीची जागा वाटपाटपाटी बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. मात्र या बैठकील विखे-पाटील स्वत: उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेक राधाकृष्ण विखे-पाटील नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे विखे-पाटील बैठकीला अनुपस्थित असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.


आज चर्चा सुरु असलेल्या आठ जागांमध्ये अहमदनगरच्या जागेचाही समावेश आहे. अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा सोडण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अहमदनगरच्या जागेचा तिढा सोडवणं दोन्ही पक्ष नेतृत्वाला जड जाण्याची चिन्ह आहेत.