Congress On Andheri By poll Election Rutuja latke win : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला. लटके यांचा हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


नाना पटोले म्हणाले की, शिवसेनेचे रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाने अंधेरी पूर्व मध्ये पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या परंपरेला तिलांजली देत उमेदवारी अर्ज दाखल केला पण या मतदारसंघात आपला निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव होताच परंपरेचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेतला. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाने अशी परंपरा कधीही पाळलेली नाही. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात मागील दोन तीन वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते, त्यामुळे त्यांचा परंपरा राखल्याचा दावा खोटा आहे.


शिंदे गटानेही या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारला हाताशी धरून शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गोठवण्याचे पाप केले. शिंदे गट व भाजपाची ही कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत म्हणूनच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अंधेरीतील विजय हा शिंदे गट व भाजपासाठी मोठा धडा शिकवणारा असून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित करणारा आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


ऋतुजा लटके 53471 मतांनी विजयी


पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत लटके या आघाडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471 मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली आहे. आजवर कोणत्याही पोटनिवडणुकीची झाली नव्हती तेवढी चर्चा अंधेरी पूर्व विधानसभेची झाली. सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. सर्वच फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. त्यांना 66 हजार 247 मतं मिळाली आहेत.


ही बातमी देखील वाचा


Andheri By Election results 2022 :ठाकरेंची 'मशाल' धगधगली, लटकेंनी अंधेरीचा 'गड' राखला, 'नोटा' दुसऱ्या स्थानी