मुंबई : महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मिळत नसल्याने काँग्रेस नेते वेटींगवर होते. याचदरम्यान खासदार संजय राऊत यांनी सामना मधून काँग्रेसच्या नाराजीवर बोट ठेवले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मात्र, आमची कसलीही नाराजी नसून काही महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्याचे मत जाणून घ्यायचे होते, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


आमची कोणतीही नाराजी नसून काही विषय असे असतात ज्यावर समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. ती चर्चा आज सकारात्मक झाली. यासाठीची भेटीची वेळ मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घरात दुखःद घटना घडल्याने ते वेळ देऊ शकले नाही. आमचे विषय प्रशासकीय होते. त्यांचं मत जाणून घ्यायचं होतं. कोरोना संकटात गरिबांना मदत कशी देता येईल, असं चर्चेच स्वरूप होतं. याविषयी न्याय योजना मांडली, ती देशपातळीवर करणं आवश्यक आहे. राज्यात अशी मदत करत येईल का? अशी चर्चा झाली. तिजोरीचा मुद्दा आहे, पण मदत करावी लागेल, असेही थोरात म्हणाले.


नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको : राजू शेट्टी


थोरात यांची विधान परिषदेवर प्रतिक्रिया
समान वाटप चर्चा आधीच झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विभाजनाचा विषय आहे. कोणत्याही अधिकाराबाबत व्यक्तिगत पातळीवर चर्चा झाली नसल्याचे थोरात यांनी सांगितले. विकास निधी वाटपावर यावेळी चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई उपस्थित होते.


काँग्रेसचा आरोप काय?
काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांचा आरोप आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं होते.


Balasaheb Thorat | कॉंग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही : बाळासाहेब थोरात