मुंबई : मुंबईतल्या बीकेसीच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर 19 नोव्हेंबरला होणाऱ्या 'कोल्ड प्ले'च्या कार्यक्रमावरुन काँग्रेसनं सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. मद्य परवानगी बाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


या कार्यक्रमात आयोजकांनी सरकारकडे मद्यपानाची परवानगी मागितली असून, सरकारनं त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसंच यापूर्वी कोणतंही सरकार अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सहआयोजक झालं नसल्याचा दावाही काँग्रेसनं केला आहे.

एमएमआरडीए ग्राऊंडच्या भाड्यात देखील आयोजकांना मोठी सवलत मिळाली आहे. ज्या क़ॉन्सर्टचं तिकीट लाखो रुपयांच्या घरात आहे, त्यावर सरकार एवढी मेहेरबानी का दाखवत आहे, असा सवाल विचारला जात आहे.

सरकार सहआयोजक असल्यानं या कार्यक्रमास अनेक सोयीसुविधा आणि सवलती आपसूक मिळाल्या आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी करमणूक करात सरकारनं सूट देऊ केली आहे, मैदानाच्या भाड्यात सवलत दिली गेली आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचं ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.