मुंबई : विरोधी पक्षांकडून 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या संघर्षयात्रेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. संघर्षयात्रेदरम्यानआमदारांनी काय करावे, आणि काय करु नये, यासंबंधीची नियमावलीच तयार केल्याचं समजतंय.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 29 मार्चपासून संपूर्ण राज्यभर संघर्षयात्रेचं आयोजन केलं आहे. या संघर्षयात्रेचं स्वरुप पाहता, माध्यमातून यावर टीका होऊ नये, यासाठी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करु नये, यासंबंधीचे आदेश सर्व आमदारांना दिले आहेत. यामध्ये संघर्षयात्रेसाठी सर्वांनी पांढरे कपडे घालावे, गॉगल घालू नये, बडेजावपणा करू नये, असे आदेश देण्यात आल्याचं समजतंय.

दरम्यान, या संघर्षयात्रेची सुरुवात 29 तारखेपासून होणार असून, याचा विस्तारीत मसूदा तयार झालेला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच या संघर्षयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.