मुंबई: अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने राज्य सरकारने मुस्लीम संघटनांच्या मागणीनुसार ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ईदची सोमवारी येणारी सुट्टी (public holidays 2024) बदलून ती बुधवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शनिवारी, रविवार, सोमवार आणि मंगळवार असा सलग सुट्ट्या डोळ्यांसमोर ठेवून फिरायला जाण्याचे किंवा आराम करण्याचे बेत आखलेल्या अनेकांचा मनसुबे उधळले गेले. खरं तर ईदची (EID A Milad 2024) सुट्टी रद्द करण्याचा हा निर्णय मुंबई आणि उपनगर परिसरासाठी घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ठाण्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून तसाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोमवारी ईदची सुट्टी असणार की नाही, यावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
ईदची सोमवारची सुट्टी बुधवारी दिल्यास नोकरदारांना नक्की काय करावे, हे कळेनासे झाले आहे. सोमवारची सुट्टी आता बुधवारी झाल्यामुळे नोकरदारांना सोमवारी कामावर जावे लागेल, त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी सुट्टी मिळेल. राज्य शासनाने फक्त मुंबई आणि उपनगरात ईदच्या सुट्टीचा वार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टीत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या जिल्ह्यात सुट्टीत बदल न झाल्यास त्याठिकाणी सोमवारीच ईदची सुट्टी मिळेल.
ईदच्या सुट्टीत बदल का केला?
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी 'ईद मिलाद उन -नबी' निमित्त मुस्लिम बांधव राज्यात जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. मात्र, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी (Anant Chaturdashi 2024) असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी घेतला होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन 'ईद मिलाद उन - नबी निमित्तची शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवार, 18 सप्टेंबर रोजी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे 'भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. अन्य मुस्लीम संघटनांनीही अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईत ईदची सोमवारची सुट्टी रद्द करुन ती बुधवारी दिली.
आणखी वाचा
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय