नवी मुंबई : डॅशिंग IAS आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा राजकारण्यांचा सामना करावा लागतो. यावेळी नवी मुंबईतील भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तुकाराम मुंढेंना आव्हान दिलं आहे.
नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर येत्या पावसाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा, आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला.
गावठाणांतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईला भाजपने विरोध केला आहे. तर शिवसेनेना आणि सत्ताधारी राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेतली आहे.
...तर तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग आणू
मुख्यमंत्र्यांनी गावठाणातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस स्थगिती दिली असताना, आयुक्त ही कारवाई कशी करतात, असा प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण लवकरच मुंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून, आवश्यकता पडल्यास येत्या अधिवेशनात मुंढे यांच्याविरोधात हक्क भंग आणण्याचा इशाराही मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
शिवसेनेची सावध भूमिका
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करून, शहराला सुनियोजित करण्याचा प्रयत्न केला आहे. घोटाळे असलेले अनेक टेंडर रद्द करून पालिकेचे करोडो रूपये वाचविल्यामुळे शिवसेनेने त्यांचं कौतुक केलं. मात्र जर सर्वसामान्यांच्याविरोधात आयुक्तांची भूमिका कायम राहिल्यास, याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हणत, सेनेने सावध भूमिका घेतली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी वेट आणि वॉचची भूमिका घेतली आहे. भविष्यात आयुक्तांवर पालिका सभागृहात अविश्वास ठराव आणायचा की नाही, याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक घेतील असे सोनवणे यांनी सांगितलं.