Gokhale Bridge Closure : अंधेरीतील (Andheri News) गोखले रेल्वे पुलाची (Gokhale Bridge) संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित करण्यात येणार आहे. संकल्पनेची कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याची बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) प्रशासनाची विनंती आयआयटी मुंबईकडून मान्य करण्यात आली आहे. मे 2023 पर्यंत पुलाच्या 2 मार्गिका खुल्या केल्या जाणार आहेत. तसेच, सप्टेंबर 2023 पर्यंत उर्वरित 2 मार्गिका देखील खुल्या होणार आहेत. 


गोखले पूल बंद केल्यामुळे वाहतुकीसाठी असलेल्या पर्यायी मार्गांवर अडथळा ठरणारे फेरीवाले आणि अतिक्रमण येत्या 2 दिवसांत हटवण्यात येणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार असून वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त 200 मनुष्यबळाची कुमक तैनात करण्यात आली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी स्थळ पाहणी करुन दिले विविध निर्देश दिले आहेत. 


अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या संकल्पना आराखड्यावर आयआयटी मुंबई यांनी अत्यंत प्राधान्यानं कार्यवाही करुन आठवडाभराच्या आत संकल्पना निश्चित करावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष विनंती करण्यात आली होती. ही मागणी आता आयआयटी मुंबईकडून मान्य करण्यात आली आहे. 


दरम्यान, गोखले पूल बंद झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवर वाहतूक सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं वाहतूक पोलीस, एमएमआरडीए आदींच्या सहाय्यानं तातडीनं उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. 


अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाचे काम टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे. सदर पुलाचे संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात आल्यानंतर सल्लागारांच्या सल्ल्यानुसार आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर पुलाची जीर्ण होत असलेली परिस्थिती लक्षात घेता, सदर पूल सोमवार 7 नोव्हेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असं असलं तरी वाहतुकीसाठी विविध पर्यायी रस्ते उपलब्ध असून त्यांचा नागरिकांनी वापर करावा यासाठी फलकांच्या (होर्डिंग्ज) माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली आहे. 


अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे :


1. स्वामी विवेकानंद मार्गावर मेट्रो प्रकल्पाची विविध कामे सुरु आहेत. या कामांसाठी लावलेले संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) अरुंद करावेत. जेणेकरुन, वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध होईल, अशी विनंती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांनी ही विनंती मान्य केली आहे. 


2. वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवरील फेरीवाले आणि अतिक्रमण 2 दिवसांच्या आत हटविण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ 4) यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गांवर अनधिकृतरित्या वाहने उभी राहणार नाहीत, याची सुनिश्चिती करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. 


3. पर्यायी मार्गांवर वाहतूक सुलभरित्या सुरु रहावी, यासाठी रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पुनर्पृष्ठीकरण करावे, हे काम रात्री करावं, जेणेकरुन वाहतुकीला बाधा पोहोचणार नाही, असे निर्देश दोन्ही सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. 


4. गोखले रेल्वे पुलाचा संकल्पना आराखडा (डिझाईन) आयआयटी मुंबई यांच्याकडे फेर तपासणीसाठी देण्यात आला आहे. सदर संकल्पनेवर तातडीने कार्यवाही करुन त्यास अंतिम रुप देण्याची विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबई यांच्याशी संपर्क साधून केली आहे. सदर संकल्पना आठवड्याच्या आत अंतिम करण्याचे आयआयटी मुंबईने मान्य केले आहे. अंतिम मंजुरीसह संकल्पना प्राप्त होताच त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात येईल. 


5. सदर पुलाचे काम अत्यंत प्राधान्याने हाती घेण्यात आले असून मे 2023 पर्यंत 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील. तर उर्वरित 2 मार्गिका सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील. 


दरम्यान, या परिसरातील वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवलं जाणार आहे. तसेच या पर्यायी मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहील, याचीदेखील काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीनं वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त 200 मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले ब्रिज बंद, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास