मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून घेण्याची 'हीच ती वेळ' आहे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाला केली. यावर तसा रितसर अर्ज दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र अशाप्रकारे भर कोर्टात मागणी करुन याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आणि कुटुंबीयांनी स्वत:च्याच अडचणी वाढवून घेतल्या आहेत, याची जाणीवही खंडपीठाने करुन दिली.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानेही वारंनार आपली नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दुसऱ्यां यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, तुमच्या कामात निदान थोडीतरी प्रगती दाखवा, या शब्दात हायकोर्टाने या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना समज दिलेली आहे. कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे गेल्या दीड महिन्यात याप्रकरणात फारसं काम करता आलं नाही, कारण या टीमलाही बचावकार्याचं काम करावं लागलं होतं. मात्र तरीही दाभोळकर आणि कलबुर्गी प्रकरणातील आरोपींचा ताबा मिळवून त्यांच्याकडून पानसरे हत्याकांडामागील सूत्रधारांची काही माहिती मिळतेय का?, याचा तपास सुरु असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं
तर दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीपात्रातून शोधून काढण्यासाठी सीबीआयला आणखीन दोन आठवडे हवेत अशी माहिती कोर्टाला देण्यात आली. मात्र 'या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची वाढीव मुदत संपण्यापूर्वी शोधकार्य संपवा' अशी आठवण हायकोर्टानं सीबीआयला करुन दिली. गेल्या महिन्यांमधील सुनावणी दरम्यान खाडीपात्रातील शोधकार्यासाठी किमान चार आठवड्यांचा अवधी आवश्यक आहे, अशी माहिती सीबीआयने हायकोर्टात दिली होती. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचे अवशेष आरोपींनी कळव्याच्या खाडित टाकल्याची माहिती आहे. या कामासाठी परदेशातील प्रशिक्षित डायव्हर्सची या कामात मदत घेतली जाणार आहे.
कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2013 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकांवर, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबीयांची मागणी
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
14 Oct 2019 01:45 PM (IST)
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानेही वारंनार आपली नाराजी व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -