नवी मुंबई : कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळेची फी भरलेली नाही. अशा विद्यार्थ्यांची माहिती शाळा प्रशासन व्हॉट्सअॅप ग्रुप वर टाकत असल्याची घटना समोर आली आहे. नेरुळमधील सेंट झेव्हियर्स स्कूलमधील एका शिक्षिकेने अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीच्या फीच्या थकबाकीची माहिती इतर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर वैयक्तिकरित्या पाठवली. अशी माहिती पाठवत ती विद्यार्थीनी डिफॉल्टर आहे, हे दाखवून सदर विद्यार्थीनीला इतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये अपमानित केल्याची घटना उघड झाली आहे. या शिक्षिकेविरोधात विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर नेरुळ पोलिसांनी सदर शिक्षिकेवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. 


कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून सर्वच शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना शाळेकडून मार्गदर्शन व सूचना देण्यात येत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळेची फी भरलेली नाही. 


नेरुळमधील सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये 9 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीच्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलीच्या शाळेची फी भरली नव्हती. शाळेकडून मुलीच्या वडिलांना फी भरण्याबाबत सांगण्यात आल्यानंतर त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाळेची फी भरण्याची तयारी दर्शवून शाळेकडून बँक अकाऊंटची माहिती सुद्धा घेतली होती. 


मात्र याचदरम्यान, सेंट झेव्हियर्स शाळेतील 9 वीच्या वर्ग शिक्षिकेने अनेक मुलांच्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही, अशा  विद्यार्थ्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकून व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली. हा प्रकार इतर विद्यार्थ्यांकडून या विद्यार्थीनीला समजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये अपमानित झाल्याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होऊन ती आजारी पडली. त्यामुळे या विद्यार्थीनीच्या पालकांनी वर्ग शिक्षिकेला सदर प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर शिक्षिकेने, फी न भरलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी लवकर भरावी, यासाठी सदर विद्यार्थीनी डिफॉल्टर असल्याची माहिती व्हॉट्सऍपवरुन टाकल्याची कबुली दिली.


त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त करुन विद्यार्थीनीच्या पालकांची माफी मागीतली होती. दरम्यान या प्रकारानंतर पालकांनी सदर शिक्षिकेविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात सेंट झेव्हियर्स शाळेतील शिक्षिकेविरोधात अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.