मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना मंगळवारी विरार-चर्चगेट लोकलमध्ये पाहायला मिळाली


 

वसईला उतरण्यासाठी विरार लोकलच का पकडली, असा उर्मट सवाल करत महिलांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीला जबर मारहाण केली. ऋतुजा नाईक, असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे.

 

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारी ऋतुजा ही वसईच्या विद्यावर्दनी कॉलेजमध्ये शिकते. महिलांच्या टोळक्याने तिचे केस आणि कपडे धरुन मारहाण केली. इतरंच नाही तर महिलांच्या वादानंतर ऋतुलाजा अस्थमाचा अटॅकही आला.

 

काय आहे प्रकरण?

ऋतुजाने मंगळवारी सकाळी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरुन 8.40 ची विरार-चर्चगेट ही लोकल पडकली. अतिशय गर्दी असल्याने ती कशीबशी महिलांच्या सेकंड क्लास डब्यास शिरली. मात्र महिलांच्या टोळक्याने तिला टोमणे मारायला सुरुवात केली. वसईला उतरणाऱ्यांनी बोरीवली, अंधेरी आणि वांद्रेपर्यंत असलेल्या लोकलमध्ये चढावं, असं म्हणत वाद घातला. वसईला उतरणारे प्रवासी नालासोपाऱ्याला चढणाऱ्यांचा रस्ता अडवतात. त्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये चढता येत नाही. नालासोपारा हे विरारनंतरचं स्टेशन आहे.

 

फाईल फोटो

वसईला उतरण्यासाठी तयारी करत असताना दोन विशीतल्या आणि दोन पन्नाशीच्या जवळपास असलेल्या चौघींनी  तिला मागे ओढलं. धडा शिकवावा या उद्देशाने तिला वसईला उतरण्यापासून रोखलं. काही महिलांनी तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या मनगटाला दुखापत झाली. मात्र ती कशीबशी वसई स्टेशनला उतरली.

 

अज्ञात महिलांविरोधात गुन्हा

वसईचे रेल्वे पोलिस निरीक्षक महेश बागवे यांच्या माहितीनुसार अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी महिलांना ओळखू शकेन, असं ऋतुजाचं म्हणलं आहे. आरोपी महिलांच्या ओळखपरेडसाठी ऋतुजा बुधवारी सकाळी 8.10 वाजता विरार स्टेशनवर पोहोचली होती. मात्र सरकारी दिरंगाईमुळे ती ट्रेन चुकली.

 

मारहाण करणाऱ्या बऱ्याच महिला नालासोपाऱ्याच्या रहिवासी आहेत. त्या नालासोपारा स्टेशनवरुन विरार लोकलमध्ये चढून डाऊन प्रवास करतात, त्यानंतर त्याच लोकलने चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतात, असं ऋतुजाने सांगितलं.