मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची करडी नजर असणार आहे. मंडळाचा पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन केलेली समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची होणार परवड रोखली जाण्याची शक्यता आहे.
दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनावेळी गोंधळ, धक्काबुकी आणि वाद होतात. यावर्षी तर पोलीस आणि लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते भिडले होते. धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
भाविकांच्या रांगा कशा असाव्यात, कोणाला अग्रक्रम मिळावा किंवा मिळू नये आदी सर्व बाबींवरती धर्मादाय आयुक्तांच्या समितीची नजर राहणार आहे. गणपती उत्सवाचा आठ दिवस आधी समिती दर्शन रांगेबाबत धोरण ठरवणार आहे. समितीत पोलीस, धर्मदाय आयुक्तालय आणि मंडळाचा पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
धर्मदाय आयुक्तांच्या सूचनेनुसार मंडळाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना कोणत्याही रांगेतून त्यांचा ओळखीच्या व्यक्तींना चुकीचा पद्धतीने सोडता येणार नाही, असा प्रयत्न झाल्यास कारवाई होणार आहे. महिला भक्तांना सुरळीतपणे दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाने महिला स्वयंसेवकांची नेमणूक करावी लागणार आहे. दर्शनबाबत काही वाद झाल्यास धर्मदाय आयुक्तालयाचा निर्णय अंतिम राहील.
लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या दानाची मोजदाद धर्मदाय आयुक्तलयाचा प्रतिनिधीसमोर होणार आहे.