मुंबई : भंपक जाहिराती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या टूथपेस्ट कंपन्यांना अन्न आणि औषध प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टचा चार कोटी 69 लाख रुपयांचा साठा एफडीएकडून जप्त करण्यात आला आहे.

चुकीच्या पद्धतीने जाहिरात करुन ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी एफडीएने कारवाई केली आहे. 'डॉक्टर्स रेकमेंडेशन, क्लिनीकली प्रूव्हन, मेडिकली टेस्टेड, दातांच्या सुरक्षेसाठी' अशी कोलगेट आणि सेन्सोडाईन टूथपेस्टची केली जाणारी जाहिरात गैरलागू आणि ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे.

कोलगेट आणि सेन्सोडाईन टूथपेस्टला कॉस्मेटिक म्हणजेच सौंदर्यप्रसाधने म्हणून परवाना देण्यात आला आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यानुसार कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टच्या वेष्टनावरील मजकूर हा गैरलागू आणि ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे.

कोलगेट, सेन्सोडाईनचा चार कोटी 69 लाख रुपयांचा साठा ठाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. तसंच या टूथपेस्टच्या निर्मात्या कंपन्या असलेल्या मे. कोलगेट पामोलिव्ह इंडिया लि. आणि मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कंझ्युमर हेल्थ लि. या कंपन्यांवर पुढील कार्यवाही एफडीएकडून करण्यात येणार आहे.