नवी मुंबई : खारघरमधील एका सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरील घरात नाग साप घुसल्यानं गोंधळ उडाला. ज्यांच्या घरात हा साप घुसला होता, त्यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. खारघरमध्ये  घरात साप घुसल्याची काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

खारघरच्या सेक्टर 14 मध्ये एस आर स्वामीनाथन हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. येथे ते आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. काल शनिवारी रात्री त्यांची पत्नी बाथरूम शेजारी ठेवलेल्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी टाकायला गेल्या असता त्यांच्या समोर चक्क नाग आला. नागाने फणा काढताच त्यांचीही पाचावर धारण बसली. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत स्वामीनाथन यांनी सर्पमित्र रघुनाथ जाधव यांना बोलावलं.

खारघरमध्येच राहणारे सर्पमित्र रघुनाथ जाधव यांनी नागाला सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. काही महिन्यांपूर्वी खारघरमध्येच एका सहाव्या मजल्यावरील घरात नाग मिळाला होता. त्यामुळे सोसायटीमधील इमारतीत तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर पोचतो कसा याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.