CM Uddhav Thackeray : राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले.


भाजपवर टीका


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राजकारणात एक नवीन साथ आली आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही. या व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. एकतर इतरांनी केलं नाही, जे केलं ते आम्हीच केलं आणि इतरांनी नवीन केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत असल्याचे दिसतात. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मुंबईबद्दलचं प्रेम हे आपल्या कामातून दिसलं पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास केला जात आहे. याआधी मुंबईकरांनी रात्रीच्या वेळी झाडे कापल्याचे प्रकार पाहिले आहेत. त्यांना आजही या घटनेचे स्मरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 


केंद्रावर निशाणा 


मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मुंबईकडून सर्वाधिक कर दिला जातो. मात्र, त्याबदल्यात मुंबईला काय मिळतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई मेट्रोसाठी कांजूरची ओसाड जमीन का दिली जात नाही, मुंबईच्या पम्पिंग स्टेशनसाठी जमिनीची मागणी करूनही ती जमीन दिली जात नाही. धारावीच्या विकासासाठी रेल्वेची जमीन दिली जात नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून होत असलेल्या अडवणुकीचा मुद्दा अधोरेखित केला.


बुलेट ट्रेनची चर्चा सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या आर्थिक विकास केंद्राची जागा देण्यात आली. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा फायदा राज्याला किती होईल असा प्रश्न उपस्थित करत मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर राज्याच्या विकासात हातभार लागला असता असेही त्यांनी सांगितले.


मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी आणि विकासासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 


मास्कचा वापर हवाच


कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर आज पहिल्यांदा मोठे कार्यक्रम होत आहेत. मात्र, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता इतरांनी मास्कचा वापर बंद केला असल्याचे दिसते. आपण निर्बंध हटवले आहेत. मात्र, मास्क मुक्ती झाली नसल्याचे त्यांनी सांगतिले. मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जोपर्यंत मास्क वापरत आहेत, तोपर्यंत मास्कचा वापर करावा असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव यांनी केले. 


दरम्यान. मुंबई मेट्रो 7 आणि मुंबई मेट्रो 2 A या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे उद्धाटन करण्यात आले. मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू आजपासून सुरू झाली. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. 


या नव्या मेट्रोमुळे मुंबईला काय फायदा?


> १८ ते २० टक्के वाहतूक कोंडी कमी होण्याचा अंदाज


> लोकलमधील १० टक्के गर्दी कमी होईल


> अंधेरी ते दहिसरचा प्रवास अवघ्या अर्धा तासात होणार


> नव्या मेट्रोचा प्रवास परवडणाऱ्या दरात होणार



>> कसे असतील तिकीट दर



0-3 किमी - 10रु
3-12 किमी - 20रु
12-18 किमी -30 रु
18-24 किमी - 40रु
24-30 किमी - 50रु
30-36 किमी - 60रु 
36-42 किमी - 70रु  
42 - 48 किमी - 80 रु