मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या रस्त्यावरील गर्दी अशी राहिली तर कोरोनाचा सामना करण्यासाठीचे निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुंबईतील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या चाचणीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. 


मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहिलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.


मेट्रोच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार झीशान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.






विकासकामांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, वर्षभराहून अधिक काळ  कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले. विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मुंबई मेट्रोच काम आखीव-रेखीव आणि देखणं झाले आहे. मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.