भिवंडी : सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येतं, मात्र आम्हा राजकारण्यांना पाच वर्षातच रिटायरमेंट मिळते, असा टोमणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.


एका सरकारी अधिकाऱ्याला उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की, ''अधिकाऱ्यांना शासनाच्या सेवेत आल्यानंतर निवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येतं. मात्र आम्हाला फक्त पाच वर्षच काम करावं लागतं. कामं व्यवस्थीत न झाल्यास लगेच रिटायरमेंट मिळते. त्यामुळं आम्हाला काम भराभर करावी लागतात.''

नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्याजवळचा उड्डाणपुल एमएमआरडीएनं असून अजूनही भरपूर कामं इथं होणार आहे. मात्र यासाठी अधिकाऱ्यांची साथ गरजेची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

याशिवाय, भिवंडी तालुका आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी जलद वाहतुकीची कामं केली पाहिजेत, असंही ते म्हणाले. 10 किमी मेट्रोलाच मागील 10 वर्षात मान्यता मिळाली आहे. पण आपण 172 किमी मेट्रोला परवानगी देऊन, त्यातील 120 किमी मेट्रोचं काम सुरु केलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

या वेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, एमएमआरडीए आयुक्त यू.पी.एस.मदान, खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, शांताराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.