मुंबई : मुंबई महापालिकेचं बजेट कोट्यवधीचं असूनही शहर पूर्णत: विकसित का नाही, असं सावाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं.

मुंबईतील कांदिवलीमधल्या उत्तर भारतीय स्नेह संमेलनात भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलांरांसह मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

'पालिकेतील माफिया राज संपवणार', भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल


मुख्यमंत्री म्हणाले की, "बजेट असूनही मुंबई पूर्णत: विकसित का नाही. याचं एकच कारण आहे, आपला पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वाहत आहे. हा भ्रष्टाचार आपण थांबवला, तर मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनण्यास कोणीही रोखू शकत नाही. ज्या क्रांतीला मोदींनी सुरुवात केली आहे, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकरच्या प्रत्येक विभागात, महापालिकेत सगळीकडे सफाईची मोहीम, भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरु करायला हवी."

दुसरीकडे मुंबई महापालिकेतील माफियाराज लवकरच संपणार आहे, अशा शब्दांत भाजप खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेमध्ये भाजप नेत्यांनी शिवसेनवर जोरदार टीका केली.