मराठा मोर्चांनंतर 'वर्षा'वर हालचाली, मराठा नेत्यांची बैठक बोलावली
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 06:24 AM (IST)
मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात मराठा समाजातर्फे आंदोलनं, मोर्चे काढण्यात आले होते. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी आज 'वर्षा' बंगाल्यावर भाजपच्या मराठा नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. राज्यभरात सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाचे मोर्चे, मूक आंदोलनांवर चर्चा करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ आणि मराठा नेत्यांची वर्षा बंगल्यावर उपस्थिती आहे. त्यासोबतच सद्य परिस्थितिवर चर्चा आणि आंदोलनाचे राज्य सरकारवर होणारे परिणाम, आगामी जिल्हा परिषद निवडणूक यावरही बैठकीत चर्चा होणार आहे कोपर्डी बलात्कारानंतर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसंच अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात मराठा समाजाने मोर्चा काढले. औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट) बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर) या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने विराट मोर्चा काढला होता. तर नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), सोलापूर, नवी मुंबई (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), पुणे (25 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.