कपिल शर्माने पंतप्रधानांना बीएमसीतील भ्रष्टाचाराबद्दल ट्विट केल्यानंतर बीएमसीने या प्रकरणी चौकशी सुरु केली. याप्रकरणी भाजपचे नेते राम कदम यांनी कपिलच्या घरासमोर आंदोलन करुन लाच मागितलेल्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली होती.
बीएमसीने केलेल्या चौकशीमध्ये कपिल शर्माने आपल्या राहत्या घरी अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे. तसंच अभिनेता इरफान खाननेही आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये अवैधरित्या बदलही केल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे.
याप्रकरणी महापालिकेने दोघांनाही नोटिस बजावली आहे. तसंच कपिल शर्मा आणि इरफान खानच्या गोरेगावमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकामप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे.
कपिल आणि इरफान अवैध बांधकाम प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना तीन वर्षांपर्यंत जेलची हवा खावी लागणार आहे. तसंच 5 हजारापर्यंतचा दंडही केला जाऊ शकतो. कपिल शर्माच्या वादग्रस्त ट्विटनंतर अभिनेता इरफान खानसोबत डीएलएच एन्क्लेव्हमधील अन्य तीन रहिवाशांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कपिलसोबतच इरफानच्या अडचणांमध्ये वाढ होणार आहे.