Marashtra Politics News : शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यादरम्यान, राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसल्या. तसेच, अनेक नवी समीकरणं जुळल्याचं पाहायला मिळालं. अशाच एका समीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. ती म्हणजे, भाजप (BJP), शिंदे गट आणि मनसेच्या (MNS) युतीची. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते, शिंदे गटातील (Shinde Group) नेते यांच्या आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. 


मनसे आणि शिंदे गटाच्या वाढत्या जवळीकीमुळे हे दोन्ही पक्ष आणि भाजपची महायुती होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ही भेट दिवाळीनिमित्त होती की, त्यात राजकीय चर्चा झाली याबाबत माहिती मिळालेली नाही. पण शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक त्यामुळे आणखी अधोरेखित झाली आहे.  


पक्षाविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यापूर्वी आणि त्यानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विसास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. याव्यतिरिक्त अनेक शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच भाजप, शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत होती. अशातच आता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.