CM Eknath Shinde : मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा. खड्डे बुजवण्याची यंत्रणा 24 तास सुरु ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार आहे. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. 


खड्यांबाबात एकनाथ शिंदे यांनी काय दिले आदेश? -


एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित कराव्यात. 


या टीम चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करतील. 


खड्डे दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत. 


नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरावे. 


आवश्यकता असल्यास त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा. 


खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना  चांगली माहिती असते. त्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेत राहा.


खड्ड्यांबाबात पोलिसांनीही संबधित यंत्रणांना माहिती द्यावी. 


महापालिकांनी रस्ते खड्डेमुक्त राहतील याची काळजी घ्यावी. 


वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास प्रकल्प राबवावा.


एमएमआर क्षेत्रातील सर्व ठिकाणी या उपाययोजना करव्यात. 



मुख्यमंत्री म्हणाले, एकंदरच एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प – रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्यात यावा. त्यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करण्यात यावे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारचे नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा. यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे. एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशाच सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.