Measles Outbreak in Mumbai: मागील काही दिवसांपासून मुंबईत गोवर (Measles) आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. मुंबईत 900 जण संशयित बालके आढळली आहेत तर आतापर्यंत सात संशयितांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.
मुंबईतील वाढत्या गोवर संर्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल घेण्यात आली. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले आहे. ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी बीएमसीला दिले आहेत.
केंद्राकडून दखल -
मुंबईमध्ये 908 संशयित रुग्ण जानेवारीपासून आढळले आहेत. सोमवारी गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राकडून याची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील 12 विभागांमध्ये रुग्णसंख्येची वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व प्रभागात आहेत. तर गोवंडीत अधिक बाधित आढळले आहेत.
गोवरची लक्षणे नेमकी कोणती?
गोवरची प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसतात. यामध्ये 104 अंशांपर्यंतचा ताप, खोकला, सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे. गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतात.